कविता

 
आयुष्य नक्की काय असतं ? चंद्र शिवा पाहिजे
 

आयुष्य नक्की काय असतं?

हसऱ्या फुलावरचं दव असतं..

नाचऱ्या मुलाचा नाच असतं..

दुखऱ्या हृदयाचा घाव असतं..


आयुष्य नक्की काय असतं,

समुद्रात चाललेलं दिशाहीन जहाज असतं,

किनारा शोधत फ़िरायचं असतं,

वादळांनी डगमगून जायचं नसतं.


आयुष्य नक्की काय असतं?

ते एक तलम रेशमी वस्त्र असतं..

ज्याचं त्यानेच ते विणायचं असतं

पण अती ताणायचं नसतं..


आयुष्य नक्की काय असतं?

सतत गुंतत जाणारं ते एक कोडं असतं

ते ज्याचं त्यानेच सोडवायचं असतं

गुंतून मात्र त्यात पडायचं नसतं

-- संकेत

 

तिने सांगेपर्यंत कधी कळलच नव्हतं त्याला,
की तो आहे एक सुंदरसा चंद्र
कारण जेव्हा जेव्हा तो तळ्यात निरखायचा प्रतिबिंब,
वाऱ्याच्या लहरी विरून टाकायच्या त्या प्रतिबिंबालाच.
जेव्हा तो पाहू लागायचा स्वतःला चांदणीच्या डोळ्यांत,
तेव्हा ती दिसायची त्याला कित्येक कोसं दूर डोळेच न दिसण्याइतकी.
जेव्हा तो पृथ्वीला विचारायचा "मी आहे कोण?" म्हणून,
ती आपल्याच नादात हिणवायची त्याला क्षुल्लक उपग्रह म्हणून.
त्याने शास्त्रज्ञांनाही विचारलं 'मी कोण?' म्हणून,
पण विजयाच्या धुंदीत त्यांनी त्याला म्हंटलं खड्डे-मातीचा गोळा.
पण आज भाऊबीजेदिवशी ती उभी राहिली आरती घेऊन, तो भाऊ नसतानाही
आणि दाखवला चांदोमामा तिने तान्हुल्याला भरवताना
तेव्हा त्याला कळलं तो चंद्र आहे.

 

अंधार होत चाललाय
दिवा पाहिजे
या देशाला जिजाऊचा
शिवा पाहिजे ॥

नेते झाले अफ़जलखान
काश्मिरचे झाले स्मशान ।
शायिस्तेखानची बोटे तोडण्यास
युवा पाहिजे।
या देशाला जिजाऊचा
शिवा पाहिजे ॥

मराठे झाले यौवनभक्त
मराठ्यांच्याच तलवारीवर
मराठ्यांचेच रक्त
पुन्हा एकदा रायगडावर
मराठ्यांचा दावा पाहिजे

हर हर महादेव
'हवा' पाहिज'
हवा' पाहिजे
या देशाला जिजाऊचा
शिवा पाहिजे

आयुष्याची पहाट

अंधाराला छेदण्याची गरज आहे...

दु:खाच्या घरी

एक व्यक्तिचित्रण रेखण्याचा प्रयत्न.......

अंधारातील प्रत्येक क्षणात मी
एक पहाट जागवली
मातीत विरघळत असतानाही मी
गरुडझेप दाखवली

सकाळच्या दवथेंबामध्ये
गुलमोहोर मी साठवला
वारयाच्याही कानात मी तेव्हा
आत्मविश्वास जागवला
समोर दिसत नाही म्हणून मी
अश्रुनींही दिवे पेटवले
हात जेव्हा भाजले तेव्हा
त्यांनीच मला सावरले

उष्ट्या रक्ताच्या समारंभातही मी तेव्हा
एक पहाट जागवली
मातीत विरघळत असतानाही मी
गरुडझेप दाखवली

सर्व ऋतु खेळून गेले
तीन पत्तीचा डाव
वादळही सांडून गेले
एक रडीचा डाव
उठतांना पंगतीतून पण
सारी आधी उठून गेली
डोळे उघडून बघण्याआधीच
वीज कडाडून निघून गेली

मुठीत ह्रदय आवळण्यात मी तेव्हा
एक पहाट जागवली
मातीत विरघळत असतानाही मी
गरुडझेप दाखवली

अस्तित्वाच्या संघर्षातही
उणे काहीच नव्हते
अंधारातील प्रत्येक वणव्यात
हात मात्र हातात होते
क्षणाक्षणातील प्रत्येक युगात
साथ मला भरपूर होती
प्रत्येक एका अमवस्येला
चांदण्यांची बरसात होती

दोन मनांच्या भेटीगाठीत मी तेव्हा
एक पहाट जागवली
मातीत विरघळत असतानाही मी
गरुडझेप दाखवली

तरीही असे का वाटते
हरवले असे का वाटते
कातरवेळी आज का
दवथेंबाचे वावगॆ वाटते
का आज नशीबाचे पाउल
मलाच थोडे उजवे वाटते
का आज दिव्यामध्ये
पतंग होऊन मरावेसे वाटते

याच उत्तरांच्या मूळ प्रश्नात मी आज
एक पहाट जागवत आहे
"होते" आणि "आहे" यामध्येच
गरुडझेप आठवत आहे

---संदीप उभळकर

 


आभाळाला भिंती घातल्या आणि मी घरंदाज झालो
वाट्याला आलेला खिडकी एवढा आभळाचा तुकडाच
माझं अवकाश बनून राहिला.....
सूर्याला फुंकर घालून घरच्या दोन पणत्या दिवाळी मानत आलो...
भिंतीवरली सावली फ़क्त मोठी झाली
बाकी सगळंच आकसून गेलं..
जाणीव, संवेदना, कक्षा आणि काही काही...
नेमक्या चार चांदण्यांची खिडकीच जगण्याची चौकट बनली...
एक नियमीत मरण रोज जगण्याची सवय झाली...
त्याचीच भलामण करत राहिलो...
भल्या मोठ्या आभळाची सवय सुटली...
एवढं मोठ्ठं तरंगतं आभाळ पाहून,
कोसळेल की काय वाटायला लगतं..
चांदण्यांचा खच पाहून डोळे गरगरायला लागतात...
समोरच्या चिरंतन अंधारातून पटकन कुणी
अंगावर ये‍ईल की काय वाटायला लागतं...
मग पुन्हा चार भिंतींत स्वत:ला चिणून घेतो...
मी असा का झालो?? असुरक्षित....
कधी निघणार मी बाहेर? मीच बंधलेल्या थडग्यातून...
खरंतर हा आभाळाचा मंडप माझ्यासाठीच आहे ना?
कधी चिमटणार मी आकाशाला?
कधी लिंपणार या चांदण्या मी माझ्या केसात??
क्षितिजावरील सूर्याकडे मान वर करुन पाहताना,
कधी फ़ुलणार इंद्रधनुष्य माझ्या डोळ्यांत?
मला या चार भिंतींच्या बाहेर पडायला हवं...
मखमली अंधाराच्या पलीकडे
खूप प्रेम देणारा हात असेल माझी वाट पाहत...
कदाचित मी प्रेम करणं विसरलो आहे...
थोडा हात लांब करुन
अंधाराला छेदण्याची गरज आहे...
कुणी येणार का बरोबर?
पहिल्यांदा अंधार अंगावर घेऊ,
मग आकाश लांब नसेल......

दु:खाच्या घरी एकदा
जमली होती पार्टी
दारु बीरु पीऊन अगदी
झींगली होती कार्टी...

दु:ख म्हणाले " दोस्तानों!
बिलकुल लाजू नका
इतके दिवस छ्ळल म्हणून
राग मानू नका!

मनात खूप साठल आहे
काहीच सुचत नाही
माझी 'स्टोरी' सांगीतल्या शिवाय
आता राहवत नाही...

मी आणि सुख दोघे
जुळे भाऊ होतो
पाच वर्षांचे होतो तेव्हा
जत्रेत गेलो होतो...

गर्दी अशी जमली
नी गोंधळ असा उठला...
माणसांच्या त्या गर्दी मध्ये
सुखाचा हात सुटला!

तेव्हा पासून फ़िरतोय शोधत
दुनियेच्या जत्रेत
दिसतोय का 'सुख' माझा
कुणाच्या ही नजरेत..."

सुखा बरोबरचे लहानपणीचे
क्षण त्याला स्मरले
आणि सुखाच्या आठवणीने
दु:ख ढसाढसा रडले!

नशा सगळ्यांची उतरली
दु:खाकडे पाहून!
दु:खालाही सुख मिळावे
वाटले राहून राहून...

सुखाच्या शोधामध्ये आता
मी सुद्धा फ़िरतोय
दु:खाला शांत करायचा
खूप प्रयत्न करतोय...

जीवनाच्या रथाचे
आहेत सुख दु:ख सारथी
सुख मिळाले तर दु:खाच्या घरी
मीच देईन पार्टी
!
 

-- दीप